औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या औरंगाबादमधील स्मारक उभारणीला एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे. तसेच या स्मारक उभारणीच्या विरोधात न्यायालयात धाव घेणार आहे असे सांगितले . इम्तियाज जलील यांनी आज पत्रकार परिषदेत या स्मारका संदर्भातील बोलतांना स्पष्ट केले. त्या वेळी ते म्हणाले , ‘ बाळासाहेब ठाकरे तसेच गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या दोन्ही स्मारकांच्या निविदा देखील काढण्यात आल्या असून लवकरच काम देखील सुरू होणार आहे. एमआयएमने मात्र या दोन्ही स्मारकांना आपला तीव्र विरोध असल्याचे सांगत न्यायालयात धाव घेण्याची भूमिका घेतली आहे.
त्यामुळे संबंधित कंत्राटदारांना आमचे आवाहन आहे की, या स्मारकांवर कोट्यावधींचा सरकारी पैसा खर्च करण्यात येणार आहे. एमआयएमचा त्याला विरोध असून आम्ही या विरोधात न्यायालयात धाव घेणार आहोत. न्यायालयाने या दोन्ही स्मारकांच्या कामाला स्थगिती दिली तर कंत्राटदारांचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे त्यांनी यामध्ये पडू नये, असा इशारा एमआयएम’ चे खासदार इम्तियाज जलील यांनी संबंधित कंत्राटदारांना दिला आहे.
जलील यांनी या स्मारकांना विरोध करण्याचे कारण देखील यावेळी सांगितले आहे. ही दोन्ही स्मारक सरकारी पैशातून उभारण्यात येणार आहे. सरकारचे कोट्यावधी रुपये स्मारकांवर खर्च करण्यास आमचा तीव्र विरोध आहे. या पैशातून चांगले रूग्णालय किंवा शैक्षणिक संस्था उभारली जावी, अशी आमची भूमिका आहे. परंतु तसे न करता हा पैसा बाळासाहेब ठाकरे व गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकावर खर्च करण्यात येणार असल्यामुळेच या विरोधात न्यायालयात जाण्याचा आम्ही निर्णय घेतला असल्याचा पत्रकार परिषेदेत इम्तियाज जलील यांनी सांगितले.